गनिमी कावा आणि परोक्ष लढाईचे तंत्र !
गनिमी कावा आणि परोक्ष लढाईचे तंत्र :-
टीप १: अपरोक्ष हा शब्द आपण बोली भाषेत एखाद्याच्या नकळत अशा अर्थें वापरतो. पण प्रत्यक्षात अपरोक्ष म्हणजे समोरासमोर . आणि परोक्ष म्हणजे आडून. एका भाषा तज्ञाने माझी चूक मला लक्षात आणून दिलीये. त्यानुसार मी लेख दुरुस्त केलाय.
गनिमी कावा आणि छ. शिवाजी महाराज हे शब्द आज समानार्थी असल्यासारखे वाटतात नाही ? या गनिमी कावा या शब्दाची ओळख आपण सर्वाना साधारण इयत्ता चौथीच्या पुस्तकातून छ. शिवाजींचा इतिहास वाचताना होते . लहानपणी आम्ही भालजी पेंढारकरांचे ऐतिहासिक चित्रपट आवडीने पाहायचो . विशेषतः त्यात दाखवल्या जाणाऱ्या लढाया. एखादया गाफील मुघल छावणीवर बाजूच्या झाडा झुडपात लपून बसलेले मावळे एकदम "हर हर महादेव " ची ललकारी देत हातातील नंग्या बाकदार समशेरी तोलत तुटून पडत आणि कापाकापी करून गायब होत . याच प्रकारच्या लढाईला गनिमी कावा म्हणतात असा माझा बरेच दिवस समज होता .
मुळात गनीम हा शब्द मूळचा फारसी आहे . त्याचा शब्दशः अर्थ शत्रू , लुटारू, डाकू . गनिमी म्हणजे शत्रूचा अशा अर्थाने बोली भाषेत हा शब्द रूढ झाला असावा . कावा म्हणजे डाव ,कपट युक्त कृती . गनिमी कावा म्हणजे शत्रूची कपट युक्त कृती असा शब्दशः अर्थ निघू शकेल .मुळात "गनिमी कावा" यापेक्षा "परोक्ष लढाईचे युद्ध तंत्र " हा अधिक अचूक शब्द प्रयोग आहे असे मला वाटते. वस्तुतः हे तंत्र मराठा साम्राज्याच्याही कित्येक शतके आधी अस्तित्वात आहे असे इतिहास पाहिल्यानंतर लक्षात येईल . जेव्हा शत्रूचे सैन्यबळ आपल्यापेक्षा अधिक असते , शत्रू सैन्य प्रशिक्षित असते , आपल्याकडे फौज फाट्याच्या खर्चाची वानवा असते अशा प्रसंगी हे तंत्र वापरतात असा सर्वसाधारण समज दिसतो आणि तो बराचसा खरा आहे . पण प्रबळ आणि प्रचंड सैन्य संख्या असणाऱ्या सेनापतींनी सुद्धा हे तंत्र अनेक वेळा वापरलेले दिसते .प्रचंड सैन्य बळावर युद्ध जिंकण्यापेक्षा ते कमीत कमी खर्चात , कमीत कमी प्राणहानीत जिंकणारा सेनापतीच महान म्हणवण्याच्या पात्रतेचा ठरतो . म्हणूनच सिकंदर , शिवाजी , वेलस्ली यांसारखे सेनापती महान म्हणून गौरविले जातात .
या परोक्ष युद्ध पद्धतीचे पद्धतशीर लेखन , आज पासून सुमारे २५०० वर्षांपूर्वी सन त्झू या चिनी सेनापतीने आपल्या " आर्ट ऑफ़ वॉर " या पुस्तकात लिहून ठेवले आहे . या पुस्तकात त्याने खाली दिलेल्या १३ वेगवेगळ्या प्रकरणात युद्ध कसे हाताळावे हे सांगितले आहे .
१. युद्धासाठी योजनेची आखणी (LAYING PLANS)
२. प्रत्यक्ष युद्ध पुकारणे (Waging War)
३. व्यूहात्मक हल्ला (Attack By Stratagem)
४. सैन्याची योग्य ठिकाणी पेरणी . (Tactical Dispositions)
५. सैन्याच्या ऊर्जेचा वापर (Energy)
६. बलस्थाने आणि कमकुवत स्थाने (Weak Points And Strong)
७. लष्करी युक्त्या (Maneuvering)
८. लष्करी धोरणे / योजनेतील लवचिकता (Variation In Tactics)
९. सैन्याच्या अचूक हालचाली (The Army On The March)
१०. भूप्रदेशाचा वापर (Terrain)
११. युध्यातील ९ परिस्थती (The Nine Situations)
१२. आगीचा लढाईतील उपयौग (The Attack By Fire)
१३. गुप्त हेर खात्याचा उपयोग (The Use Of Spies).
(हे पुस्तक मराठीतून उपलब्ध आहे .) परोक्ष लढाईच्या साठी आवश्यक असे जवळपास सर्व मुद्दे यात चर्चिले आहेत. ज्यांनी ही तत्वे वापरली ते विजयी झाले आणि ज्यांनी या तत्वांकडे दुर्लक्ष केले ते मोठ्या सेनेचे सेनापती असून ही हारत गेले असे इतिहास सांगतो .
शत्रूवर चढवलेला थेट हल्ला हा नेहमीच फलदायी होत नाही . आणि जरी झाला तरी फार मोठी किंमत त्यासाठी मोजावी लागते . कसलेला शत्रूचा सेनापती तर अशाच हल्ल्याची प्रतीक्षा करत असतो . त्यापेक्षा , परोक्षपणे , आडवाटेने केलेला अनपेक्षित हल्ला हा यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते आणि कमी प्राणहानीत यश मिळण्याची शक्यता वाढते . सुप्रसिद्ध युद्ध विषयक लेखन करणारे लीडेल हार्ट यांच्या strategy of indirect approach या पुस्तकातील काही ठळक मुद्दे इथे देत आहे . (हे मुद्दे मला "पटावरील युद्ध" या सोमनाथ समेळ यांच्या पुस्तकात मिळाले ते इथे जसे च्या तसे देत आहे . )
१. नद्या नाले , डोंगर - पठारे आदी नैसर्गिक अडथळे ओलांडण्यास कितीही अवघड असले तरी समोर समोरच्या लढाईच्या धोक्यापेक्षा ते कमी अवघड असतात .
२. बचावात्मक धोरण ही श्रेष्ठ युद्धनीती ठरते व ती अधिक काटकसरीची असते . त्याने शत्रूचा तोल ढळू शकतो .
३. शत्रूस चुकीची चाल करण्यास जी चाल भाग किंवा मोहात पाडते ती परोक्ष चाल सर्वात प्रभावी ठरते . मल्ल युद्धप्रमाणे शत्रुच्याच बळाचा वापर या तंत्राने त्याच्याच विरुद्ध होतो .
४. शत्रूवर थेट धडक मारण्यापेक्षा त्याच्या पुरवठ्याचे मार्ग व केंद्रे यांवर केलेली चाल , त्याचा डोलारा कोसळवण्यास करणीभुत होते .
५. अशा चालीच्या धास्तीनेही शत्रूचेही मनोधैर्य गळून पडून त्यास रणांगणावरून माघार घेण्यास प्रवृत्त केले जाते . त्याचा समतोल बिघडवणारी ती मानसशास्त्रीय चढाईच असते .
६. शत्रूच्या दुर्बल घटकांचा आधी समाचार घेतल्यास , बलाढ्य पक्षही दुर्बल बनून तो कोसळू शकतो .
७. प्रत्यक्ष चढाई करून शत्रूचा तोल घालवण्यापेक्षा त्यापूर्वीच त्याचा तोल गेलेला असल्याची कारवाई फायद्याची ठरते .
या शिवाय युद्ध जिंकण्यासाठी फोर एफ नावाची एक चतुःसूत्री आहे .
१. फाईंड द एनिमी
२. फिक्स द एनिमी
३. फाईट द एनिमी
४. फिनिश द एनिमी
कुठल्याही लढायांकडे अभ्यासपूर्ण नजर टाकली तर वरील तत्वे निर्णायक ठरली आहेत हेच वारंवार सिद्ध होते . आपण काही लढायांचे तपशील पाहू .
सिकंदर पौरस यांच्यातील युद्ध - पौरस राजाच्या सैन्यातील गजदलापुढे आपल्या रोमन घोडदळाचा निभाव लागणार नाही हे सिकंदरने आधीच ओळखले होते . म्हणून जेव्हा झेलमच्या तीरावर दोन्ही सैन्ये समोरासमोर ठाण मांडून बसलेली असताना त्याने थेट चढाईचा मोह टाळला . आपल्या एका पथकाद्वारे नदीस उतार शोधण्याच्या निमित्ताने त्याने पौरसच्या सैन्यास झुलवत ठेवले . भारतीय सैन्य गाफील होईस्तोवर त्याने ही नीती अवलंबली . हल्ल्याच्या आधीही सिकंदरने अन्न धान्याची भरपूर बेगमी करून ठेवली होती . आणि ही बातमी पौरसास समजेल अशी व्यवस्था केली . त्यामुळे ग्रीक सैन्य पावसाळा संपेपर्यंत नदी ओलांडत नाही अशी खात्री भारतीय सेनानींची झाली. भारतीय सैन्य गाफील झालेले पाहून एका वादळी रात्री त्याने मूळ सैन्य तळाच्या कित्येक मैल पुढे जाऊन झेलम ओलांडली . ती सुद्धा संपूर्ण सैन्यासहित नाही. पौरसाच्या समोर अजूनही त्याचा सैन्य तळ अजूनही दिसत होता . गोधळात पडलेल्या पौरसाने आपले रथदळ आणि धनुर्धारी यांची पथके पुढे पाठवली . चिखलात भारतीय रथ अडकून पडले आणि सिकंदरच्या धनुर्धारी घोडदलाने त्यांची सहज शिकार केली . नंतर भारतीय गजदलापुढे स्वतःचे घोड दल न आणू देता गजदलास बगल देऊन पौरसाची पिछाडी गाठली आणि भारतीय सैन्याची कत्तल केली. पौरसास ज्यापद्धतीने त्याने गंडवले तो वर उल्लेखित परोक्ष लढाईच्या तंत्राचाच वापर होता हे सहज समजेल.
याच कालात (इ स पु २१६ ) हॅनिबलच्या रोमन विरोधी चढाया पहिल्या तर या गनिमी किंवा परोक्ष लढाईच्या तंत्राचे महत्व उठून दिसते . उलट या तंत्राकडे दुर्लक्ष करून हॅनिबल विरुद्ध थेट मुसंडी मारणाऱ्या रोमन सैन्याची कॅने च्या संग्रामात धूळधाण उडाली . या लढाईत हॅनिबलने आपले आघाडीचे पायदळ कच खातय असे भासवले. हॅनिबलचे पायदळ मागे हटत असल्याचे पाहून सर्व रोमन पायदळ भगदाड पाडण्यासाठी तिथे घुसू लागले . तिथे इतकी गर्दी झाली की पुढे पुढे शस्त्र चालवणे कठीण झाले. मग हॅनिबल ने आपले घोडदळ बगलेवरून काढून रोमन पायदळावर चालवले . नंतर फक्त कत्तलच झाली. ७६००० रोमन सेनेपैकी ७०००० रोमन सैनिक त्यांच्या सेनापती पोलस सहित मारले गेले . पुढे सीपीओने याच परोक्ष तंत्राचा वापर करून झामाच्या लढाईत हॅनिबल चा पराभव केला.
जसे जसे तंत्र ज्ञान प्रगत होत गेले तस तसे युद्ध तंत्र बदलले. मात्र युद्धाची वरील मूलभूत तत्वे बव्हंशी तीच आहेत असे दिसते . पानिपत ची पहिली लढाई पाहिली तर पारंपारिक युद्ध पद्धतीवर नवीन तंत्रज्ञाने मात केलेली दिसते. लोधी च्या जवळपास एक लाख सैन्याचा बाबराच्या तोफखान्याने या लढाईत धुव्वा उडवला. हुमायूनने तीच अवस्था पानिपतच्या दुसऱ्या युद्धात हेमूच्या ३०००० घोडदळाची आणि गज दलाची केली. नंतर मोगली युद्धपद्धतीत चढाईच्या वेळी लागणार डाम डोलारा वाढू लागला . प्रचंड पायदळ , तोफा , घोडदळ , त्या बरोबर बुणगे , लवाजमा आणि अनावश्यक फाफट पसारा हे चढाईचे आवश्यक भाग बनले . त्यामुळे सन त्झू च्या ८ व्या लवचिकततेच्या तत्वास धक्का बसला .छ. शिवाजी यांनी याच कमकुवत पणाचा फायदा उठवून आदिलशाही , मोगल या फौजांना नामोहरम केले . या साठी आपण अफझल खानाच्या स्वारीवर एक धावती नजर टाकू . ३०००० घोडदळ , २०००० पायदळ , १५०० बंदूक धारी , ८० तोफा या सामुग्रीसहित अफझखान मराठा स्वराज्य बुडवायला आला . शिवाजीस मैदानात खेचून आपल्या प्रचंड सैन्य शक्ती ने त्यास चिरडून टाकायचे असा डाव त्याने आखला . शिवाजीस बाहेर खेचण्यासाठी त्याने हिंदू धर्म स्थळे उध्वस्त केली . पण शिवाजी राजे या डावात फसले नाहीत . उलट त्यांनीच, गोड बोलून, घाबरल्याचे नाटक करून खानास जावळीच्या जंगलात खेचून आणले . खानाची प्रचंड सैन्य संख्या हे त्याचे बलस्थान त्याचे कमकुवत स्थान बनले . मग शिवाजी ने चतुराईने त्याला त्याच्या सैन्या पासून वेगळे करून त्याचा वध केला . आणि आपल्या मोजक्या मावळी सैन्याकडून त्याच्या फौजेची धूळधाण उडवली . आपल्या बलस्थानाचा आणि शत्रूच्या कमकुवत स्थानाचा कसा वापर करायचा हे अभ्यासायचे असेल तर प्रतापगड चे युद्ध अभ्यासावे . सुरत लुउटीच्या वेळी शिवाजींनी केलेल्या गुप्तहेर खात्याचे तपशील आज उपलब्ध असते तर अभ्यासासाठी एक वेगळे दालनच उघडे झाले असते . इतकेच नाही तर पुरंदरच्या वेळी वेळ काळ पाहून प्रसंगी त्यांनी माघारही घेतली . मोडेन पण वाकणार नाही वगैरे असल्या फुटकळ अभिमानांत ते अडकले नाहीत . शिवप्रभुंची दूर दृष्टी तर चकित करणारी आहे . सिद्दी , इंग्रज यांच्या मध्ये पाचर मारण्यासाठी त्यांनी दुर्लक्षित अशा खांदेरीच्या बेटावर किल्ला बांधला . त्यासाठी इंग्रज - मराठे यांत झालेले नाविक युद्ध प्रसिद्धच आहे . केवळ नाविक बळावर इंग्रज टेकीस येत नाहीत असे पाहून त्यांनी ठाण्या मार्गे ४००० सैनिक मुंबईत उतरवण्यासाठी तयारी केली . अर्थात ही भूल असू शकेल. पण आपल्या बगलेवरील नवीन संकट पाहून मुबईतील इंग्रजांची घाबरगुंडी उडाली . इंग्रजांची आर्थिक नाकेबंदी करून , त्यांना अनेक ठिकाणी शह देऊन खांदेरी मराठ्यांनी जिंकलेच . (या लढाईची सविस्तर माहिती शिव छत्रपतींचे आरमार या आणि इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ या पुस्तकात मिळेल .) खांदेरी हे मुंबईवर लक्ष ठेवण्यासाठी उत्तम असे "आउट पोस्ट " होते . मात्र या बेटाचा पुढे कोणताच उपयोग करून घेतला गेला नाही हे दुर्दैव ! जिंजीचा किल्ला हा सुद्धा त्यांच्या दूरदृष्टीचा नमुना आहे . त्याचाच वापर पुढे राजाराम महाराजास झाला .
या काळामधील २७ वर्षाचे युद्ध हे तर स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे . यशाची कोणतीही खात्री नसताना , केवळ इच्छा शक्ती आणि जिद्दीच्या जोरावर वेगवेगळ्या मराठा सेनापतींनी मुघल सत्ता खिळखिळी करून टाकली . मुघली फौजांशी प्रत्यक्ष सामना टाळून , त्यांना बगल देत , चकवत , लाच देत , जहरी छापे टाकत ज्या पद्धतींनी त्यांनी अजस्त्र मुघली सेनेस जेरीस आणले त्यास तोड नाही . धनाजी जाधव , संताजी घोरपडे आणि इतर कितीतरी माहित नसलेले मराठा सेनानी यांनी मराठी राज्य राखले. त्यांच्या समोर त्यांच्या दोन छत्रपतींचा मृत्यू झाला , पण त्यांनी जिद्द सोडली नाही . माझ्या मते हे २७ वर्षाचे युद्ध हा परोक्ष चढाईच्या तंत्रातील मानबिंदू ठरावा.
नंतर पेशवाईत बाजीराव पेशव्याची पालखेडची लढाई तर प्रसिद्धच आहे . या बाबतीत फिल्ड मार्शल मॉंटगोमेरी यांनीही बाजीरावाचे कौतुक केले आहे . निजामाच्या तोफखान्याने सुसज्ज अशा फौजेवर आपले चपलगती घोडदळ घालण्याचा आततायीपणा टाळून निजामाचे रसद मार्ग तोडून, त्याला त्याच्या अवजड सैन्यासहित पळायला लावून पालखेड च्या डोंगरी भागात खेचून शरण आणले.
गनिमी किंवा परोक्ष तंत्राचा वापर सर्वच ठिकाणी होईल असेही नाही . वसईच्या लढाईत परोक्ष तंत्राचा वापर झालेला दिसत नाही . त्यामुळे जरी वसई जिंकली तरी मराठ्यांना त्याची जबर किंमत मोजवी लागली .
पानिपत च्या ३ ऱ्या लढाईत गोलाची लढाई का गनिमी कावा यावरून मल्हारराव आणि पेशवे यांच्यातील वाद प्रसिद्धच आहे . त्यामुळे ना धड गोलाची लढाई ना धड गनिमी लढाई या गोंधळात मराठा सैन्याची कत्तल उडाली. अभ्यासूंनी उदय कुलकर्णी यांचे सोलस्टीस ऍट पानिपत हे पुस्तक वाचावे .अब्दालीने फिक्स द एनिमी, फाईट द एनिमी आणि फिनिश द एनिमी या तत्वांचा वापर करून मराठ्यांस नमवले .
टीप २ :- गोलाची लढाई म्हणजे काय ? या तंत्राचे मूळ पायदळ चौकोनात आहे . शत्रूच्या घोडदळाच्या हल्ल्या विरुद्ध ही पद्धत वापरली जाते . शत्रू जेव्हा त्याचे घोडदळ आपल्या पायदळावर घालतो तेव्हा आपल्या पायदळाची चौकोनात रचना केली जात असे . पायदळात सौनिक एका मागोमाग तीन किंवा अधिक रांगेत आपापले लांब भाले बाहेरच्या बाजूस करून थांबत . पुढे पुढे भाल्यांची जागा संगिनींनी घेतली . साहजिकच घोडे त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीने अणकुचीदार भाल्यापासून दूर राहात . आणि चौकोनात असलेल्या आपल्या पायदळातील बंदुकीचे शिकार बनत . वॉटर्लूच्या लढाईत वेलस्लीने फ्रेंच सेनानी मार्शल ने याचा फ्रेंच घोडदळाचा हल्ला असाच निष्प्रभ केला .
पहिल्या इंग्रज मराठा युद्धात वडगावच्या लढाईत महादजी शिंद्यानी याच परोक्ष तंत्राचा वापर करून इंग्रजी फौजेस शरण आणले . प्रत्यक्षात मराठा सैन्य इंग्रजांपेक्षा कैक पट जास्त होते . तरीही महादजींनी आपले घोडदळ कवायती पलटणींवर घातले नाही . त्यांनी इंग्रजी सेनानीस आमिषे दाखवत , खेचत खेचत वडगावच्या डोंगरी भागात आणले . दग्दभू धोरण स्वीकारून आणि छापामार करून त्यांचे रसद मार्ग तोडले. आणि वडगाव जवळ मग निर्णायक लढाई देऊन कमीत कमी प्राणहानीत विजय मिळवला . मात्र पुढे हातात आलेल्या शत्रूस सोडून त्यांनी अक्षम्य चूक केली . वडगावच्या पराजयाचे उट्टे मग इंग्रजांनी , सिप्री, मलंगगड वगैरे ठिकाणी काढले .(या सिप्रीच्या लढाईची माहिती फार मिळत नाही आणि त्यावर फार बोलले जात नाही . या विषयी अभ्यास होणे जरूर आहे .)
पुढे या युध्याच्या अनुभवावरून शिकून महादजीनी कवायती पलटणे बनवून घेतली . त्यांचा वारस दौलतराव हाही कवायती पलटणे बाळगून होता . आणि त्याचा त्यास भारी अभिमान वाटे . मात्र या कवायती युद्ध शैलीचा पूर्ण गृहपाठ होण्याआधीच मराठ्यांची गाठ दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात अनुभवी आणि मातबर इंग्रजी कवायती फौजांशी पडली . तेही वेलस्ली सारख्या सेने धुरंधराशी ! परिणामतः अनुभवा अभावी आणि कुशल नेतृत्वाअभावी मराठ्यांस अपेशी व्हावे लागले. यशवंतराव होळकराचे काही विजय अपयशाच्या दुःखावर मलम लावतात इतकेच .
३ऱ्या इंग्रज मराठा युद्धातील रावबाजीचा पळ हे गनिमी काव्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे असे वर्णन सरदेसाई करतात . वस्तुतः ते योग्य नाही . रावबाजीचा पळ हा उद्दिष्टहीन होता असे स्पष्ट दिसते . इकडून इंग्रजी फौज येतीय असे कळले की पळ दुसरीकडे , तिकडून शत्रू आलेला काळला की पळ तिसरीकडे असा कावा काय कामाचा ? या पळास इंग्रज जरी वैतागले तरी काहीच साध्य झाले नाही . विशिष्ट् उद्दिष्टाशिवीय केलेला हा पळ व्यर्थ गेला ,राज्य बुडवून गेला. असो .
आधुनिक इतिहासात सुद्धा या परोक्ष तंत्राचा वापर अनेक ठिकाणी दिसून येतो . फ्रांस मुक्त करण्यासाठी दोस्त सेनानीनी हल्ला करण्याचे योजिले होते . त्यानुसार फ्रान्सच्या कॅले वर हल्ला होणार या हिशेबाने हिटलर, रोमेल आदींनी बलाढ्य अटलांटिक भिंत उभी केली होती . पण दोस्तांनी दूरवरील नॉर्मंडी चा किनारा निवडला. तत्पूर्वी मुख्य हल्ला कॅलेवरच होणार हे हिटलर रोमेल आदींना भासवण्यासाठी कॅले समोर प्रचंड तयारी केल्याचे भासवले . ६ जून १९४४ रोजी कॅलेवर सैनिकां सारखे दिसणारे छत्रीधारी बाहुली उतरवली . आणि इकडे प्रत्यक्ष नॉर्मंडीवर ५००० युद्ध नौका , १०००० विमाने , १५६००० सैनिक यांच्यासहित चढाई केली . त्यातील पहिल्याच दिवशी ११००० मरण पावले पण नॉर्मंडीवर घट्ट पाय रोवता आले.
परोक्ष तंत्राची अशी कितीतरी उदाहरणे इतिहासात सापडतील . गनिमी कावा म्हणजे केवळ लुटालूट किंवा छापेमारी युद्ध असे नाही हे दाखवण्यासाठी मी हा लेख प्रपंच केलाय . तसेच गनिमी कावा प्रत्येक वेळी यश देतोच असे नाही हे ही तितकेच खरे . हे तंत्र म्हणजे आपले अंतिम उद्दिष्ट गाठण्यासाठी उपलब्ध असलेले साधन आहे , साध्य नाही हे लक्षात ठेवायला हवे .
संदर्भ :-
१. पटावरील युद्ध -सोमनाथ समेळ
२. रियासत - सरदेसाई
३. इतिहासाच्या पाऊलखुणा (१)
४. शिव छत्रपतींचे आरमार - मेहेंदळे , शिंत्रे
५. मराठ्यांचा युद्धेतिहास - पित्रे
६. आर्ट ऑफ वॉर - सन त्झू
७. काही इंटरनेट स्रोत
-कौस्तुभ पोंक्षे
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (कौस्तुभ पोंक्षे ©) कॉपीराईट आहे.
Comments
Post a Comment